दिठी मराठी चित्रपट



  मला आवडलेला सलील कुलकर्णी यांचा एक भारी लेख 

"दिठी" ...किशोर कदम.... आणि आरती प्रभूंचा चष्मा....
एखादा माणूस दुसऱ्याच्या दुःखात असा " पूर्णपणे " म्हणजे अगदी " संपूर्णपणे " दुःखी होऊ शकतो ????......
... पोथी वाचणारी सुरकुतलेली माणसं...सतत ..सतत ऊर फोडून  कोसळणारा पाऊस....अडकलेली गाभण गाय...काही अगतिक माणसं...आणि पोरगा पाण्यात वाहून गेला म्हणून गायीच्या डोळ्यांपेक्षा करुण दिसणारे...वाहणारे.... त्याचे डोळे...." गाईचे डोळे करून उभे की..सांज निळाईतले..." असं ग्रेस म्हणतो तेच हे डोळे...किशोर कदम ने जगलेल्या " दिठी " मधल्या अगतिक बापाचे.
दि.बा. मोकशींच्या कथेवर आधारित " दिठी " हा सुमित्रा भावेंचा चित्रपट म्हणजे एक संपूर्ण अनुभव आहे....
अनेक वर्ष उत्तमोत्तम भूमिका करणाऱ्या शशांक शेंडेच्या  हाळीवर हा चित्रपट सुरू होतो आणि तिथपासून एक सलग कविता .. खरं तर अभंग चालू राहतो..शब्दातून.. अभिनयातून आणि धनंजय कुलकर्णी ह्यांच्या  कॅमेऱ्यातून...!! शशांक शेंडे सारखी मंडळी खऱ्या अर्थाने अभिनयाचे मापदंड ...पोटातून व्यक्तिरेखा जगणारे.. बोलतांना नुसते शब्द नाही तर तडफड व्यक्त करणारे डोळे ...आणि कमालीचा सहजपणा...!!
गिरीश कुलकर्णी प्रत्येक भूमिका अशी जगतो की हा तोच...किंवा हाच तो असं वाटत राहतं... प्रत्येक वेळी संपूर्ण देहबोली इतकी वेगळी होते त्याची की ..या व्यक्तिरेखेच्या मणक्याला किती बाक असावा...इथपासून खाली ओणवा बसतांना नेमका पाय किती दुमडावा असा संपूर्ण विचार करताना तो जाणवतो..सतत ह्या मित्राचा अभिमान वाटत राहतो.
अमृता सुभाष ने पकडलेला सुर इतका अनोखा आहे की अनेक वर्षांचा अनुभव एखाद्या अभिनेत्रीला किती परिपूर्णतेकडे नेऊ शकतो ह्याचे ती उत्तम उदाहरण आहे
अस्तु मधले मोहन आगाशे स्वप्नांत येतात माझ्या...हा माणूस किती सहज आहे..किती..!!!!
     मी कॉलेज मध्ये  पाहिलेले अगाशेंचे नाना फडणवीस , काटकोन त्रिकोण मधले बाबा , अस्तू मधले आजोबा  आणि आता दिठी मधली भूमिका...काय बोलू ?
" मोहन आगाशे भूमिकेची तयारी करताना " अशी काही कॅसेट मिळेल का ? पुढच्या पिढीने वाचायला हवीत ही पुस्तकं...जी अगाशेंच्या डोळ्यात दिसतात.
     अंजली पाटील हा एक अजबच प्रकार आहे. म्हणजे इतका अजब की चित्रपटात  कमीत कमी वाक्य बोलून  हृदयात जास्तीत जास्त खोल जाणारे हीचे डोळे आणि एकूणच ज्याला एखादी गोष्ट जाणवणे आणि आकळणे म्हणतात हे सगळच जमले आहे तिला...आता फक्त तिच्या पुढच्या भूमिकांची वाट पाहायची..
   आणि...
तीस पस्तीस वर्ष वारी करणारा आणि तरुण पोरगा पाण्यात वाहून गेल्यावर वेडापिसा झालेला आणि परमेश्वराला जाब विचारता विचारता .. मुळात तो आहे ? मुळात आपण तरी खरेच आहोत का? आणि मग त्याच्या अस्तित्वाला आव्हान देता देता पुन्हा एकदा शरण जाणारा एक बाप ...किशोर कदम....
एक अतिशय संवेदनशील माणूस. हळवा कवी आणि अभिनेता असलेला  किशोर कदम गेली पंचवीस वर्षांच्या विविधांगी अनुभवांचा एक परिपाक या भूमिकेत मांडतो.
    किती तडफड , पुन्हा पुन्हा..मुलाला आठवून आठवून वेडापिसा झालेला हा बाप ..सूनेवर " तुला मुलगा होईल आणि माझा मुलगा मला परत देशील असं वाटलं होतं ..पण मुलगी झाली... आता तिचं रडणं नाही ऐकवत...जा तुम्ही दोघी.. मसणात जा नाहीतर कुठं बी जा "असं म्हणणारा किशोर आणि ....नंतर... " ह्या तुझ्या म्हाताऱ्या लेकराला माफ कर " म्हणणारा किशोर.....
गायीचं बाळंतपण करतांना उजव्या हाताची हालचाल , खांदा ,मान सगळे स्नायू त्याने असे काही वापरले आहेत की.....हा हे सुईणपण कसं आणि कुठून शिकला असेल ? सुमित्रा मावशींनी नक्की काय सांगितलं असेल.. ही उत्सुकता वाटत राहते.
त्याच्या चष्म्याच्या डाव्या काचेवर असलेला एक तडा..खूप लक्षात राहिला.....किशोरने असा अभिनय केलाय की तो काचेवर नव्हे त्याच्या डोळ्यावरच तडा गेलाय असं वाटावं....त्याचा चष्मा...तो कोसळणारा पाऊस...किशोर सारख्या हळव्या कवीच्या तोंडी काही ओव्या..काही अभंग.. मोकाशिंची उत्कृष्ट कथा आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टीच्या पोटात शिरून ती गोष्ट मांडणाऱ्या सुमित्रा भावे... ह्या सगळ्यांनी एकदम..डोक्यात आरती प्रभू उभे केले..." पुरावरील पडाव मध्येच पडावा " म्हणणारे ... चष्यातून अगतिक बघणारे ...खचलेले..तरीही सतत काहीतरी खोल बोलणारे.....ते तर गेले...कश्यासाठी उतरावे तंबू ठोकून म्हणाले.. आणि गेलेच...
पण त्यांचा चष्मा ? तो कुठे असेल ?
कोणी जपून ठेवला ?
कवीचा चष्मा कवीला मिळतो...?
किशोर कुठून आणलीस ही वेदना डोळ्यांत ?
मला  आज " दिठी " मध्ये आमच्या किशोरच्या  डाव्या डोळ्याच्या काचेला तडा गेलेला तो चष्मा पाहून वाटलं....हे आरती प्रभू ..!?
त्यांचा असेल का तो चष्मा ?
आपल्या दिठीची चौकट नकळत धुकं धुकं झाली...
सुमित्रा ताई...साष्टांग नमस्कार !! 🙏🙏
सलील कुलकर्णी.
गोवा फिल्म फेस्टीवल.
३०.०६.२०१९

Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2